सातारा : एका प्रसिध्द पेढे व्यावसायिकास ३० लाखाच्या खंडणीसाठी बॉम्बन उडवून देण्याची परदेशातून धमकी दिल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. व्यावसायिकाने या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
गेल्या आठ दिवसापासून मोदी यांना इंटरनॅशनल कॉल येत आहेत. या कॉलवरून तीस लाख रुपये दे, नाहीतर बॉम्ब लावून उडवून देईन, अशी धमकी देण्यात आली. सुरुवातीला त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर रात्री-अपरात्री देखील त्यांना फोन येण्याचे तसेच मेसेज करुन वारंवार तीस लाख रुपये देण्यासाठी धमकावले जाऊ लागले. व्यावसायिकाने या प्रकरणी पोलीस मुख्यालयात याबाबत ई-मेल करुन तक्रार अर्ज पाठवला.
या अर्जासोबत त्यांनी १० ते १२ वेळा ज्या नंबरवरून फोन आले तो नंबर, मेसेज याचे स्क्रीन शॉट देखील जोडले आहेत. वेगवेगळ्या दोन नंबर वरुन एकाच प्रकारची धमकी दिली जात असल्याचे या अर्जात व्यावसायिकाने म्हटले आहे. दरम्यान, व्यावसायिकाने मंगळवारी सायंकाळी सायबर पोलीस विभागात जाऊन माहिती दिली असून अधिक तपास सुरु झाला आहे.