कोल्हापूर : महाविकास आघाडी आणि भाजपने प्रतिष्ठेची केलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज (शनिवारी) जाहीर झाला. महाविकास आघाडीतर्फे लढलेल्या काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी 18 हजार 901 मतांनी विजय मिळवला आहे. तर, भाजपच्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जाते.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री यांना मतदारांनी विजयी केले आहे. महाविकास आघाडी विरोधात भाजप अशा अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसला गड राखण्यात यश आले आहे. आक्रमक प्रचार आणि नेत्यांची फौज मैदानात उतरवूनही विजय न मिळाल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातो. काँग्रेस नेते, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे सतेज पाटील यांचे राजकीय वजन वाढले. तर, चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का बसला.
या विजयामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदाराचा मान जयश्री जाधव यांना मिळाला आहे. कोल्हापूरच्या जनतेने स्वाभिमान राखला असल्याची प्रतिक्रिया जयश्री जाधव यांनी विजयानंतर दिली आहे.