नागपूर : ग्रॅच्युइटीचे धनादेश देण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी १५ हजार या प्रमाणे ३० हजारांची लाच घेताना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केंद्रीय सहायक कामगार आयुक्त विनय कुमार जयस्वाल यांना अटक केली.
लाच मागितलेले दाेन्ही कर्मचारी निवृत्त असून निवृत्तीच्या वेळी दोन्ही कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थान रिकामे केले नव्हते. त्यामुळे त्यांच्या विभागाने त्यांच्या ग्रॅच्युइटीचे प्रकरण सहायक कामगार आयुक्तांकडे सोपवले होते आणि ग्रॅच्युइटीची रक्कम सहायक कामगार आयुक्त कार्यालयात जमा केली होती. दोन्ही कर्मचाऱ्यांनी ग्रॅच्युइटीचे धनादेश मिळण्यासाठी सहायक कामगार आयुक्त विनय कुमार जयस्वाल यांच्याशी संपर्क साधला असता त्याने प्रत्येकी ३० हजाराची लाच मागितली. तडजोडीअंती प्रत्येकी १५ हजार या प्रमाणे ३० हजार देण्याचे ठरले. दोघांनीही सीबीआयच्या एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यांनी सापळा रचून लाच घेताना अटक केली.
केंद्रीय अधिकाऱ्याने लाच घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच सावनेर नगर परिषदेतील दोन कर्मचाऱ्यांना २० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे सावनेरच्या नगर परिषद कार्यालयात खळबळ उडाली आहे. सचिन विठ्ठलराव पडलवार (३१, सावनेर) आणि शेखर गोविंदरावजी धांडोळे (३४) अशी लाच घेणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
सावनेरमध्ये राहणाऱ्या ५५ वर्षीय तक्रारदाराने पत्नीच्या नावाने भूखंड घेतला होता. त्या भूखंडाची नगर परिषदेतून गुंठेवारी काढायची होती. त्यासाठी तक्रारदाराने नगर परिषद कार्यालयात रितसर अर्ज केला होता. मात्र, त्या अर्जाची दखल घेण्यात येत नव्हती. त्यामुळे त्यांनी सावनर नगरपरिषदेच्या संगणक परिचालक शेखर गोविंदराव धांडोळे याची भेट घेतली. त्याने अर्जाची दखल घेण्यासाठी कर व प्रशासकीय अधिकारी प्रभारी नगर रचना सहायक सचिन पडलवार यांची भेट घेण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदारांनी पडलवार यांची भेट घेतली. त्यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली. लाच न दिल्यास भूखंडाची गुंठेवारी काढण्याचे काम करण्यास नकार दिला.