पुणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर सध्या विदर्भात वाढला आहे. पुढील दोन दिवस मात्र पूर्व विदर्भात पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. रविवारी (दि.24) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
राज्यात शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या दमदार सरी पडल्या. गडचिरोली 130 मिमी.तर चंद्रपूरला 100 मिमी. इतका पाऊस झाला. कोकण,मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली होती. घाटमाथ्यावर ही तुरळक ठिकाणी पावसाचा जोर पहायला मिळाला.
सध्या कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकला आहे. ओडीशा आणि परिसरावर चक्राकार वारास्थिती सक्रीय असून कर्नाटकपासून कोमोरिनपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे रविवारी (दि.24) पूर्व विदर्भातील चंद्रपूर,गोंदिया, गडचिरोली, उत्तर कोकणातील पालघरसह नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.तसेच नागपूर,चंद्रपूर, अकोला, गडचिरोली आणि गोंदीया येथे पुढचे दोन दिवस जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
आज रविवारी (दि.24) पावसाचा यलो अलर्ट असलेली ठिकाणे
पालघर, नाशिक, चंद्रपूर, गोंदिया,गडचिरोली, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, अकोला, नागपूर