मुंबई : मी ऐकले आहे, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. सरकारमध्ये काही बदल होऊ शकतात, असे वक्तव्य माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यामुळे शिंदे- फडणवीसांच्या गेली दोन दिवस सुरू असलेल्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली, यावर दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. यात अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य आठ आमदारांच्या नियुक्तीमुळे भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे गटातील नाराज आमदारांचे मन वळविण्यावरही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील वर्षा निवासस्थानी बैठक झाल्यांने आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्य सरकारमध्ये काही बदल होऊ शकतात कारण मी ऐकले आहे की एकनाथ शिंदे यांना राजीनामा देण्यास सांगितले जाणार आहे. एकवर्षापूर्वी ज्यांनी गद्दारी केली. स्वत:ची इज्जत काय आहे ते दाखवली. त्यांना आज भाजपने त्यांची खऱी किंमत काय दिलीय ते दाखवलं आहे. जे ओरिजनल गद्दार आहेत. त्यांच्याबद्दल मला हसू येतंय. आम्ही आता कॅबिनेट मंत्री बनू, राज्य मंत्री बनू या एका आशेने ते तिथे गेले. चार दिवस झाले शपथविधी होऊन पण अद्याप खातेवाटप झालेले नाही. ज्यांनी त्यांना फोडले त्यांनीच त्यांची खरी किंमत दाखून दिली आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.