मुंबई : शिवसेनेत बंड करुन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या धक्क्यातून शिवसेना सावरत नाही तोच ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 12 आमदारांची (12 MLA) यादी मंजूर केली नव्हती. मात्र आता राज्यात नवं सरकार आलं आहे. या नवनिर्वाचित सरकारकडून आता राज्यपालांकडे 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी नावे पाठवली जाणार आहेत.
राज्यपालांनी मागील दीड-दोन वर्षापासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या 12 उमेदवारांची यादी विधान परिषद आमदारकीसाठी पाठवली होती. मात्र, राज्यपालांनी त्यावर आक्षेप घेत ही यादी तशीच ठेवली होती. यावरुन मोठे राजकारण झाले होते. राजीनाम्याची घोषणा करताना उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लोकशाहीवरुन टोमणा मारताना आतातरी 12 आमदारांची यादी मंजुर करावी, असे म्हटले होते. आता शिंदे सरकार स्वीकृत सदस्यांची नवीन यादीच पाठवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
राज्यपालांना विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेत 12 आमदार नियुक्त करण्याचे अधिकार असतात.
या विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा हा सभागृहाला व्हावा, असा हेतू या नियुक्ती मागे असतो.
आता लवकरच राज्य सरकारकडून 12 जणांची यादी पाठवली जाणार आहे.
त्यामुळे या यादीत कोणाची नावं असणार याकडे सर्व इच्छुक मंडळींच लक्ष असणार आहे.