शिंदे आजींच्या भेटीला मुख्यमंत्री ठाकरे कुटुंब ‘शिवडी’त

0

मुंबई : राणा दाम्पत्याने ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केल्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर ठिय्या मांडला. त्यात शनिवारी (दि. 23) 80 वर्षीय आजींनी देखील पहारा दिला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण कुटुंबीयांसह पहारा देणाऱ्या आजींची भेट घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांनी 80 वर्षीय आजी चंद्रभागा शिंदे यांची त्यांच्या शिवडी येथील घरी जाऊन भेट घेतली. मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी दोन दिवसांपासून ठिय्या मांडला आहे. त्यातच आजी चंद्रभागा शिंदे यांनी देखील शनिवारी हजेरी लावली. त्यांचा उत्साह तरुणाईला देखील लाजवणारा होता.

आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी चंद्रभागा शिंदे आजींची त्यांच्या घरी जाऊन सहकुटुंब भेट घेतली. pic.twitter.com/k8f8h1GsIh

— ShivSena – शिवसेना (@ShivSena) April 24, 2022

या शिवसैनिकाचे कौतुक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट आजींचे घर गाठले. आजींची भेट घेऊन त्यांची विचारपूस करत त्यांचे आशीर्वाद देखील मुख्यमंत्र्यांनी घेतले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “व्यक्ती वयाने मोठी होत असते. ती मनाने मोठी असली पाहिजे. आजींसमोर मी नतमस्तक व्हायला आलो. हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. शिवसैनिक झुकनेवाले नाहीत. आजी मनाने युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत.”

आजींचे आभार मानून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीवर येण्याचे आमंत्रण दिले. आजींचा सत्कार करून कुटुंबीयांची भेट घेऊन मुख्यमंत्री परतले.

Leave A Reply

Your email address will not be published.