औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत भाजपसह विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. सभा सुरु होणार म्हणून मी कुणावर तोफ डागणार अशा बातम्या रंगल्या आहेत, पण ढेकणांना चिरडण्यासाठी तोफ लागत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आज जवळपास माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतर सहा महिन्यांनी मुंबईच्या बाहेर पाऊल टकलं आहे. पहिलं पाऊल हे शिवसेनाप्रमुखांच्या आवडत्या संभाजीनगरमध्ये आलेलो आहे. जिथे जिथे नजर जाते तिथे लोकच लोकं आहेत. आज मराठवाड्यात शिवसेनेने पहिलं पाऊल टाकलं होतं ती आजची तारीख. ती केव्हाची सभा होती ते मला आठवत नाही. औरंगाबाद महापालिकेची सभा झाल्यानंतर ती सभा झाली होती. मी व्यासपीठावरुन नाही तर संभाजीनगरच्या कोणत्यातरी गच्छिवरुन सभा पहात होतो. आणि आज एवढी वर्षे झाली तरी मैदान भरलेलं आहे. आजसुद्धा तोच जल्लोष आणि उत्साह आहे.
अजूनही शिवसैनिकांची झुंड येते कुठेही काही कमी नाही. अजूनही शिवसैनिकांची झुंड येत आहे. मी आज आपल्या रुपामध्ये तुळजाभवानी आईचं दर्शन घेतलं आहे. मी येताना काही काळ हॉटेलमध्ये टीव्हीमधील सभेचे दृश्य बघत होतो. आकाशातून सभा कशी दिसतेय ते बघत होतो. देव आपली सभा कशी बघत असतील ते बघत होतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.