टोकियो: रविवार भारतासाठी अपेक्षाभंग करणारा ठरला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकांची दावेदार म्हणून गेलेल्या मनु भाकरच्या स्वप्नांवर पाणी फेरले. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात मनुला अपयश आले.
पात्रता फेरीत मनुला 12वे स्थान मिळाले, आणि यासह ऑलिम्पिक पदकाची अपेक्षाही संपुष्टात आली. मनुने पात्रता फेरीत 575 गुण मिळवले. यावेळी तिच्या पिस्तूलमध्ये बिघाड निर्माण झाला होता, ज्यामुळे तिला काही काळ आपला खेळ थांबवावा लागला. मनुचे प्रशिक्षक रौनक पंडित यांनी तिच्या पिस्तूलमध्ये काय बिघाड झाला होता, याचा खुलासा केला आहे.
पहिल्या सीरिजमध्ये 98 गुणांची कमाई केल्यानंतर तिने 95, 94, 95, 98 आणि 95 असे गुण मिळवले. त्यामुळे टॉप-10 मधून ती बाहेर पडली. पिस्तुलच्या लेवरमध्ये बिघाड झाला होता, त्यामुळे तिला काही वेळ खेळ थांबवावा लागला. ती दुरुस्ती केल्यानंतर मनुने तिचा खेळ पुन्हा सुरू केला.
रौनक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मनुची पिस्तुल बिघडली होती. तिच्या पिस्तुलमधील लेवर तुटला होता, त्यामुळे तिला पिस्तुल उघडता येत नव्हते, तसेच पॅलेट्सही घालता येत नव्हत्या. सहसा 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये घडत नाही. 25 मीटर प्रकारात पिस्तुलमध्ये बिघाड होणे ही सामान्य गोष्ट आहे.
लेवर हा पिस्तुलाचा अंतर्गत भाग आहे. त्यामुळे हे कसे घडले हे नक्की सांगता येणे कठीण आहे. असे होण्याची शक्यता 0.1 टक्के असते. 1999 पासून मी वापरत असलेली पिस्तुल अद्यापही चांगली स्थितीत आहे. पण मनुच्या बंदुकीचा लेवर चार वर्षातच तुटला. हा अंतर्गत भाग असल्याने आपल्याला तो उघडून दुरुस्त करावा लागतो. मनुने पिस्तुल उघडून तो दुरुस्त केला.
मनुसह यशस्विनीनेही या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पण अंतिम फेरीत स्थान मिळविण्यात तिलाही अपयश आले. 575 गुणांसह मनु 12व्या तर यशस्विनी 574 गुणांसह 13व्या स्थानावर राहिली. अंतिम सामन्यात पात्रता मिळविण्यसाठी 577 गुणांची आवश्यकता होती.