माॅस्को ः रशियाने करोनाचे लसीकरण सुरू केलेले आहे. राजधानी माॅस्कोपासून सुरू करण्यात आलेल्या या लसीकरण मोहिमेत आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांचा सामावेश आहे. माॅस्कोमध्ये ७० लसीकऱण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये रशियाने विकसित केलेल्या ‘स्पुटनिक व्ही’ नावाची लस देण्यात येत आहे.
डाॅक्टर, शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कर्मचाऱ्यांना लस टोचून घेण्यासाठीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये २० लाख डोस उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. माॅस्कोच्या महापौर सर्गेई सोब्यानीन यांनी सांगितले की, ”काही तासांमध्येच ५ हजार लोकांनी लस टोचून घेण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच त्यांत्या मंजूरी पत्रकावर स्वाक्षरीदेखील केली आहे.”
रशियातील नागरिकांना ही लस मोफत उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर इतर देशांमध्ये या लसीची किंमत फक्त १० डाॅलर म्हणजेच ७४० रुपये एवढ्यात उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही लस २८ दिवसांमध्ये ९१.४ टक्के प्रभावी ठरली आहे तर, ४२ दिवसांमध्ये ९५ टक्के प्रभावी ठरलेली आहे.