पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कोरोना बाधित पोलिसांसाठी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे 30 बेडचा सुसज्ज वॉर्ड तयार करण्यात आला आहे. साहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या विशेष प्रयत्नातून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. देशभरात बेडची चणचण भासत असताना पोलिसांसाठी अशी व्यवस्था होणे ही पोलिसांसाठी दिलासादायक बाब आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त सुधीर हिरेमठ, मंचक ईप्पर, आनंद भोईटे, डॉ. यशराज पाटील, डॉ. जे एस भवाळकर, डॉ. एच एस. चव्हाण कार्यक्रम उदघाटन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड पोलीसांसाठी सध्या बेड मिळणे जिकरीचे झाले असल्याने डी. वाय. पाटील प्रशासनाशी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संपर्क साधून विनंती केली असता त्यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला.
डी. वाय. पाटील हॉस्पीटल, पिंपरी येथे 30 बेडचा विशेष कक्ष हॉस्पिटलने पोलिसांसाठी निर्माण करून दिला आहे. सर्व 30 बेड हे ऑक्सीजन पुरवठायुक्त असणार आहेत. तसेच क्रेडाई पुणे चे अध्यक्ष फरांदे यांच्या माध्यमातून या वार्डसाठी पाच व्हेंटीलेटर सुध्दा पुरविण्यात येणार आहेत.
कोरोना संक्रमणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस व त्यांचे कुटुंबियांना तात्काळ उपचार मिळावे यासाठी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय कटीबध्द आहे. यामुळे पोलीस दलाचे मनोधैर्य उंचावले असून कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सुसज्य आहे.