जळगाव : मुलाविरुद्ध दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात इतरांना आरोपी न करण्यासाठी 60 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 15 हजार रुपये लाच मागणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्याविरुद्ध जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव एसीबीने सावदा पोलीस ठाण्यात आज (मंगळवार) गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड (32, रा. सावदा, ता. यावल, जि. जळगाव), सहायक पोलीस निरीक्षक देविदास दादाराव इंगोले (52, रा. सावदा, ता. रावेर, जि. जळगाव) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 42 वर्षाच्या व्यक्तीने जळगाव एसीबीकडे 30 ऑगस्ट 2022 रोजी तक्रार केली आहे.
तक्रारदार यांच्या मुलावर सावदा पोलीस ठाण्यात IPC 376 (2) (N), पोस्को कायद्यांतर्गत 24 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रारदार यांच्या मुलाला 27 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. तक्रारदार हे त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी सावदा पोलीस ठाण्यात गेले होते. तक्रारदार यांनी गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांची भेट घेतली. त्यावेळी गायकवाड यांनी तक्रारदार यांना सांगितले की, तुमचा मुलगा मुलीला घेऊन ज्यांच्या घरी थांबला होता त्यात तुम्ही स्वत: तुमची पत्नी, भाऊ, बहिण यांना गुन्ह्यात सह आरोपी करणार आहे. सह आरोपी न करण्यासाठी गायकवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे 60 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे 30 ऑगस्ट रोजी तक्रार केली.
जळगाव एसीबी पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी गुन्ह्यात सह आरोपी न करण्यासाठी 60 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 15 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच सहायक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांनी गायकवाड याला लाच घेण्यास प्रोत्साहीत केले.
पुढील तपास जळगाव एसीबीचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील करीत आहेत.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, पोलीस अधीक्षक सुनील, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार, पोलीस उप अधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, संजोग बच्छाव, पोलीस नाईक बाळु मराठे, ईश्वर धनगर, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाणे यांच्या पथकाने केली.