जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन सावकारांवर गुन्हे

0

सातारा : चार लाखांचे 12 लाख व 98 हजारांचे पाच लाख रुपये व्याजासह परत करूनही आणखी जादा पैशांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघा खासगी सावकारांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल लक्ष्मण कदम व शिवाजी यशवंत काळे (दोघे रा. मसूर, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सागर जगदीश पुरोहित (वय 32, रा. मसूर, ता. कराड) याने पोलिसांत फिर्याद दिली आहे.

सागर पुरोहित हा आई, वडील, पत्नी व दोन मुले यांच्यासह मसूर येथे राहावयास आहे. त्याचे मसूर-उंब्रज रोडवर शुभारंभ मल्टिपर्पज मंगल कार्यालय आहे. 2016 रोजी या कार्यालयाचे बांधकाम सुरू असताना आर्थिक अडचणीमुळे सागर पुरोहित याने अनिल कदम याच्याकडून 4 लाख रुपये 30 टक्के व्याजदराने घेतले होते. त्यानंतर दर महिन्याला अनिल कदम हा व्याजाच्या पैशासाठी सागर पुरोहित याला तगादा लावत होता. तसेच वारंवार जीवे मारण्याची धमकी देत होता. त्या भीतीपोटी सागरने वडिलांच्या बँक खात्यातून दोन ते तीन लाख रुपये अनिल कदम याला वारंवार दिले होते.
दरम्यान, 2017 मध्ये सागर पुरोहित याच्या वडिलांना त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे गेल्याचे समजल्यावर त्यांनी याबाबत सागरला विचारले. त्यावेळी सागरने बांधकामावेळी चार लाख रुपये 30 टक्के व्याजाने घेतल्याचे व त्यासाठी मला अनिल कदम जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी अनिल कदम याला बोलावून घेत, तुझ्याकडून 4 लाख घेतले होते व आत्तापर्यंत तुला 12 लाख 50 हजार रुपये परत दिले आहेत. यापुढे माझ्या मुलास कसलाही त्रास देऊ नकोस असे सांगितले. त्यावेळी त्याने त्रास देणार नाही, असे कबूल केले होते. मात्र, 2018 मध्ये अनिल कदम हा परत येऊन पैसे दे नाहीतर जीवे मारेन, अशी धमकी देऊ लागला.

माझ्याकडे पैसे नाहीत म्हटल्यावर कदम याने तुला पैसे हवे असतील तर शिवाजी काळे हा व्याजाने पैसे देतो, त्याला मी पैसे देण्यास सांगतो, असे सागरला सांगितले. त्यावर सागरने जीवाच्या भीतीने 12 मार्च 2021 रोजी शिवाजी काळे याच्याकडे पैसे मागितले. त्याने सागरला 20 टक्के व्याजाने 98 हजार 500 रुपये दिले. ते पैसे शिवाजी काळे याने सागर पुरोहित यांच्या गुगल पे अकाउंटवर पाठवले होते. त्यातील 45 हजार रुपये सागर याने अनिल कदम यास दिले होते. त्यानंतरही कदम व काळे हे सागरला दर महिन्याला पैशाच्या व्याजासाठी धमकी देऊ लागले. तेव्हा सागरने शिवाजी काळे याचे गुगल पे अकाउंटवर 19 सप्टेंबर 2022 अखेर 5 लाख 5 हजार 500 रुपये पाठवले होते. तरीसुद्धा ते दोघे वारंवार सागरला मंगल कार्यालयाजवळ येऊन धमकावत होते.

सागरला त्रास सहन न झाल्याने तो सतत मानसिक तणावाखाली होता. त्यामुळे सागरने होणाऱ्या त्रासाबद्दल चिठ्ठी लिहून ड्रॉवरमध्ये ठेवली होती. याबाबत वडिलांनी विचारल्यावर त्या दोघांपासून माझ्या जीवितास धोका असल्याने तक्रार दिली नव्हती, असे सांगितले. घरी चर्चा झाल्यानंतर उंब्रज पोलिसांत संबंधित दोघांविरोधात सागर पुरोहित याने पोलिसांत तक्रार दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आबा जगदाळे तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.