अपयश झाकण्यासाठी शिवसेनेवर टीका : गोऱ्हे

0

मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचे पानीपत झाले. निवडणुकीत आलेल अपयश झाकण्यासाठी शिवसेनेवर टीका करणे ही भाजपची केविलवाणी धडपड आहे,” अशी टीका शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपवर केली.

राज्यात विधानपरिषदेच्या धुळे-नंदुरबार एक, शिक्षक दोन आणि पदवीधर तीन अशा एकूण 6 जागांवर निवडणूक झाली. या एकूण जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. या यशानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “आम्ही एक तरी जिंकलो, पण ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही,” असे म्हणत शिवसेनेला लक्ष्य केले.

भाजपच्या टीकेला उत्तर म्हणून, “स्वत:चे अपयश झाकण्यासाठी शिवसेनेवर टीका करणे ही भाजपची केविलवाणी धडपड आहे. महाविकास आघाडीला स्थापन होऊन एक वर्ष झाले. या सरकारच्या माध्यमातून कोंडलेल्या लोकशाहीला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली. पुढचेही एक पाऊल म्हणायचे झाले, तर या सरकारमुळे ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश’ असे झाले आहे. नागपूर आणि पुणे ही दोन मतदारसंघं दीर्घकाळापासून भाजपकडे होती. या मतदारसंघांतही महाविकास आघाडीच्या उमेदरवारांना विजय मिळाला आहे,” असे निलम गोऱ्हे म्हणाल्या.

 
Leave A Reply

Your email address will not be published.