छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत राडा

पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

0

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरामध्ये रविवारी (ता. 14) रात्री दोन गटांत तुफान दगडफेक झाली. यात पोलिस कर्मचाऱ्यांसह 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 31 जणांना ताब्यात घेतले आहे.

शेवगाव शहरात रविवारी रात्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक मेरी रोड मार्गे शेवगाव शहरातील मुख्य एसटी स्टँड चौकात आली. तिथून पुढे ही मिरवणुकी जात असताना डीजेवरून दोन गटात तुफान राडा झाला. रात्री आठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनूसार, सुरूवातीला एका गटातील एकाने दगड भिरकावला. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटानेही दगडफेक सुरू केली. दोन्ही गटांच्या आक्रमकपणामुळे घटनास्थळी नंतर तुफान दगडफेक झाली. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

दगडफेक सुरू असतानाच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, यादरम्यान 2 पोलिस कर्मचारी जखमी झाले. तसेच, दोन युवकही गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर सोमवारी शेवगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. बंदमुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाल्याने ग्रामीण भागातून खरेदीसाठी शेवगावात आलेल्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

रात्री दोन गटातील हाणामारीच्या घटनेनंतर अज्ञात जमावाने शहरातील विविध दुकानांवर व फलकांवर दगडफेक केली. त्यामुळे रस्त्यावर दगड, विटांचा व फरशांचा सडा पडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला पथकासह रात्रीच शेवगाव शहरात दाखल झाले होते. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.