नांदेड : नांदेडमधील किनवट तालुक्यात तीन शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
तीन शेतकऱ्यांनी आपल्या कापसाच्या शेतात विनापरवाना बेकायदेशीर गांजाची लागवड केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई करत गांजा ताब्यात घेतला आहे.
किनवट तालुक्यातील चंद्रपूर येथील एका शिवारात तीन शेतकऱ्यांनी संगनमत करत विनापरवाना बेकायदेशीर गांजाची लागवड केली. कापसाच्या शेतात तिघांनीही गांजाची लागवड केली होती. यासंदर्भातील माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई करून तब्बल 52 किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास करण्यात आली आहे.
किनवट तालुक्यातील चंद्रपूर शिवारात येथील तीन शेतकऱ्यांनी कापसाच्या शेतात चक्क गांजाची लागवड केली आहे. आपल्या शेतात बेकायदेशीरित्या एनडीपीएस कायद्याचा भंग करत अंमली पदार्थ गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांना मिळाली होती. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं चंद्रपूर शिवारातील कापसाच्या शेतावर कारवाई केली. कारवाईमध्ये गुन्हे शाखेनं शेतातील तब्बल 52 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. या गांजाची किंमत तब्बल दोन लाख 61 हजार चारशे रुपये असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वतीनं देण्यात आली आहे. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांच्या फिर्यादीवरून किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारिजुआना हा एक अंमली पदार्थ आहे. ज्याचं सेवन धूम्रपानाच्या स्वरूपात किंवा गोळीच्या स्वरुपात केलं जातं. त्याचं जास्त सेवनं केल्यानं मेंदूच्या विकासावर परिणाम होतो, तसेच स्मरणशक्तीवरही परिणाम होऊ शकतो. यामुळे नैराश्य आणि इतर मानसिक आरोग्य समस्या देखील उद्भवतात.