पिंपरी : जर्मनी येथील एका कंपनीचा ई मेल हॅक करुन चिंचवड येथील फोर्बस मार्शल या नामवंत कंपनीला सायबर चोरट्यांनी 50 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी फोर्बस मार्शल कंपनीच्या वतीने हेमंत गणेश झेंडे (57, रा. तळेगाव दाभाडे) यांनी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फोर्बस मार्शल या कंपनीचे जर्मनीतील डायकॉम कंपनीबरोबर व्यवसायिक संबंध आहे. सायबर चोरट्यांनी या दोन्ही कंपन्यांमधील व्यवहाराच्या माहितीचा डाटा चोरला. जर्मन कंपनीचा ईमेल हॅल करुन फोर्बस मार्शल या कंपनीला जर्मन कंपनीच्या ई मेलसारखा वाटणारा ई मेल पाठविला.
कंपनीमार्फत विनोद देशपांडे यांनी 6 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर दरम्यान जर्मन कंपनीशी ई मेलवरुन संपर्क साधला होता. त्यानुसार त्यांनी जर्मनी कंपनीच्या ई मेल आयडीवर 50 लाख 27 हजार 437 रुपये (56 हजार 450 युरो) पाठविले. प्रत्यक्षात डायकॉम कंपनीचा ई मेल हॅक करुन ही रक्कम आंतरराष्ट्रीय सायबर चोरट्यांनी अल्टर बँक आर्यलंडच्या खात्यात जमा केल्याचे उघडकीस आले आहे. तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.