मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी शिंदे – फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्त्वाच्या नऊ नेत्यांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीतून बाहेर गेलेले सर्व लोक हे आमचे सहकारी नाहीत, तर माझ्या कुटुंबातील लोक आहेत. असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
शरद पवार हे सर्वांसाठी अतिशय प्रिय आहे. शरद पवारांनी सर्वांना घरातील मुलासारखे वागवले. त्यामुळे ही झालेली घटना आम्हाला वेदना देणार नाही. पण त्याची काही कारणे असतील. अजित दादाशी मी कधीही वाद घालणार नाही. दादा आणि माझ्यात वाद होणार नाही. ते माझे मोठे भाऊ आहेत. मात्र, जेव्हा पक्षाचा प्रश्न येतो तेव्हा मी प्रोफेशनली बघते. 2019 आणि 2023 मध्ये चार वर्षे उलटले आहेत. थोडीशी जबाबदारी माझ्यावर आली आहे, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कोणाच्याही आयुष्यात किती संघर्ष करण्याची आली, तर साताऱ्याची सभा आणि शरद पवारांचा आश्वासक चेहरा, हे त्याचे उत्तर असल्याचे त्या म्हणाल्या. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, त्यातून बदलण्याचा एक मार्ग असतो. दुसरा मार्ग नव्या उमेदीने उभा करायचा असतो, असे देखील त्या म्हणाल्या.
आता पुन्हा एकदा संघटना नव्या उमेदीने उभी करायची आहे. लोकांबरोबर जायचं आहे. पुढे जात महाराष्ट्राचे आणि देशाची सेवा करत चांगले काम उभे करायचे आहे. ही आमच्या सर्वांची जबाबदारी असल्याचा निर्धार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केला.