मुंबई : अवकाळी पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असून ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह आंबा व इतर पिकांची हानी झाली आहे. नागपूर जिल्ह्यात वीज पडल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे.
नागपूर जिल्ह्यात भिवापूर तालुक्यातील पेंढराबोडी आणि कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी येथे वीज पडून सचिन रामाजी सहारे (३५) व अमोल नारायण काखे (२५) यांचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात आनंदराव श्यामराव चव्हाण (रा. चिंचखेड, ता. किनवट), माधव दिगंबर वाघमारे (रा. मौजे सुजलेगाव, ता. नायगाव) यांचा वीज पडून मृत्यू झाला.
मराठवाड्यातील काही भागात गारांसह जोरदार पाऊस झाला. रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात देवठाणा, कांदेवाडीसह इतर गावांमध्ये बुधवारी मध्यरात्री गारांसह जोरदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या परिसरातील संपूर्ण शेती पांढरीशुभ्र झाली. सर्वत्र गारांचे खच साचले होते.
विदर्भातही पावसाने तडाखा दिला. नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती जिल्ह्यात गारपीट झाली. हरभरा, गहू, कापूस, संत्रा, मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यालाही अवकाळीचा फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळसह नवापूर तालुक्यात गारपीट झाली.
शुक्रवारी पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.