मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शिंदे – फडणवीस सरकारकडून आनंदाची बातमी आली आहे. विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेच्या वेळी पंढरपूरच्या पांडुरंगाचे मुखदर्शन सुरू राहणार आहे. यापूर्वी महापूजा होईपर्यंत चार तासासाठी दर्शन बंद करण्यात येत होते. मात्र, आता मुखदर्शन सुरू राहणार असल्याने दर्शनाची आस असलेल्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शासकीय महापूजाच्या चार तासापूर्वीच दर्शनाची रांग बंद करण्यात यायची. त्यामुळे वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. यामुळे रांगेतील कालावधी चार तासाने वाढायचा. वारकऱ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची महापूजा सुरू असताना देखील आता मुखदर्शन सुरू राहणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात बैठक घेतली. मुख्यमंत्री पहाटे अडीच वाजेपासून पूजेला येतात आणि जवळपास पहाटे पाच वाजेपर्यंत ही पूजा सुरू असते. या कालावधीमध्ये आता सुमारे दीड ते दोन लाख भाविकांना पांडुरंगाचे मुखदर्शन घेता येणार आहे.
पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. या काळात राज्यातील खासदार, आमदार, मंत्री, अधिकारी दर्शनासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाचरणी दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र, या काळात वारकऱ्यांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यांना पांडुरंगाचे दर्शन घेता येत नाही. मात्र आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.