तुर्कस्तान : तुर्कस्तान व सिरियातील भूकंपबळींची संख्या ११ हजारांच्याही पुढे गेली आहे. या दशकातील हा सर्वाधिक प्राणहानी करणारा असा हा विनाशकारी भूकंप ठरला आहे.
तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान या भूकंपग्रस्त क्षेत्रास सध्या भेट देत आहेत. त्यांनी सांगितले, की एकटय़ा तुर्कस्तानमधील मृतांची संख्या साडे आठ हजारांच्या पुढे गेली आहे. पहिल्या दिवशी बचावकार्य तोकडे पडल्याचे त्यांनी मान्य केले. परंतु त्यानंतर आता मदत कार्याने वेग घेतला आहे, याबाबत स्थिती सुधारल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या कोणत्याही नागरिकास आम्ही मदतीपासून वंचित ठेवणार नसल्याचे एर्दोगान यांनी स्पष्ट केले. तुर्कस्तान व सिरियात भूकपग्रस्त भागात ठिकठिकाणी अनेक बचाव पथके दिवस-रात्र काम करत आहेत. या विनाशकारी भूकंपामुळे कोसळलेल्या हजारो इमारतींच्या ढिगाऱ्यांतून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. बुधवारी मृतांची संख्या अकरा हजारांवर गेली आहे. हा भूकंप एका दशकाहून अधिक काळातील सर्वात प्राणघातक ठरला आहे. नेपाळमध्ये २०१५ मध्ये आलेल्या ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात आठ हजार ८०० मृत्युमुखी पडले होते. दुर्दैवाने त्यापेक्षाही हा भूकंप अधिक प्राणघातक ठरला आहे.
तुर्कस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले, की देशातील मृतांची संख्या सात हजार १०८ वर पोहोचली असून, शेजारच्या सीरियातील मृतांसह एकूण मृतांची संख्या नऊ हजार ६३८ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, सीरियातील सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या भागात मृतांची संख्या एक हजार २५० वर पोहोचली आहे, तर दोन हजार ५४ जखमी झाले आहेत. ‘व्हाईट हेल्मेट’ या स्वयंसेवी संस्थेच्या माहितीनुसार बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या वायव्य भागात कमीतकमी एक हजार २८० जण मृत्युमुखी पडले आहेत व दोन हजार ६०० हून अधिक जखमी झाले आहेत. तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान बुधवारी भूकंपाचे केंद्र असलेल्या पॅझार्सिक शहरात आणि सर्वात जास्त नुकसाग्रस्त प्रांत हातायमध्ये भेट देणार होते. तुर्कस्तानात भूकंपग्रस्त भागात सुमारे साठ हजार बचाव पथक कर्मचारी राबत आहेत. परंतु हा विनाश इतका व्यापक आहे की बरेच भूकंपग्रस्त अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे सरकारकडे अधिक मदत पाठविण्याची मागणी सातत्याने होत आहे. तुर्किस्तानात अनेक वाचलेल्या भूकंपग्रस्तांनी मोटारीत, बाहेर किंवा सरकारी आश्रयस्थानांत झोपावे लागत आहे. कडाक्याची थंडी व भूकंपोत्तर धक्क्यांमुळे बचाव प्रयत्नांत अडथळे येत होते. जोखीमही वाढत आहे. २५ हून अधिक देशांतील शोध पथके बचावकार्यात सामील झाली आहे. जागतिक समूहाकडून मदतीचा ओघ सुरू आहे.
सिरियासारख्या भागात अनेक संकटांवरचे हे विनाशकारी संकट असल्याचे सांगून जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी अॅडेलहेड मरशग यांनी या भूकंपग्रस्त प्रदेशात तब्बल दोन कोटी ३० लाख नागरिकांना झळ पोहचल्याची शक्यता व्यक्त केली.