मंत्रालयासमोर विष प्राशन करणाऱ्या महिलेचा मृत्यू

0

मुंबई : मुंबईत काल (27 मार्च) मंत्रालयासमोर एका महिलेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आज उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. शीतल गादेकर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून ती धुळ्यातील असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी काल महिलेला मंत्रालयासमोरूनच ताब्यात घेत जे जे रुग्णालयात दाखल केले होते. महिलेच्या पतीचा धुळे एमआयडीसीमधील प्लॉटवर एकाने बेकायदेशीर कब्जा केला, अशी महिलेची तक्रार होती. प्रशासनाने या प्रकरणात आपल्याला न्याय द्यावा, या मागणीसाठी महिलेने आंदोलन केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल गादेकर या महिलेच्या पतीच्या नावावर धुळे एमआयडीसी परिसरात प्लॉट आहे. हा प्लॉट 2010 मध्ये तत्कालीन एमआयडीसी अधिकाऱ्यांनी संगणमत करुन बळकावला. खोटी नोटरी बनवून हा प्लॉट नरेश कुमार, मानकचंद मुनोत यांच्या नावावर करण्यात आला, अशी महिलेची तक्रार होती. यासंदर्भात महिलेने तक्रार दिली होती की, तत्कालीन एमआयडीसी अधिकाऱ्यांनी खरेदी खत ऐवजी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बोगस सह्या करुन शितल गादेकर यांचे पती रवींद्र गादेकर यांच्या छायाचित्रांचा गैरवापर करत हा प्लॉट हस्तांतरित केली.

शितल गादेकर यांनी याबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह माजी मुख्य सचिव, तसेच प्रधान सचिव, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, पोलिस महासंचालक, पोलिस महानिरीक्षक, धुळ्यातील पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या जागेच्या संदर्भात न्याय मिळावा, या मागणीसाठी शीतल गाडेकर यांनी 2020 पासून सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता. तसेच 27 मार्च रोजी मंत्रालयात आत्मदहन करण्याचा इशारा देखील त्यांनी मागील महिन्यात दिला होता. मात्र, तरी देखील न्याय मिळत नसल्याने नैराश्यातून त्यांनी मंत्रालयासमोर विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु या घटनेत त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Leave A Reply

Your email address will not be published.