कराड : सातारा जिल्ह्यत मंगळवारपासून १ जूनपर्यंत सक्त टाळेबंदी लागू झाली आहे. गेल्या २० दिवसांपासून टाळेबंदी, कठोर टाळेबंदी व सक्त कारवाईचा अंमल सुरूच आहे. मात्र कोरोना रुग्णवाढ ही सुरुच आहे.
जिल्ह्यत कोरोना संशयित म्हणून चाचण्या, तपासण्या केलेल्या १२ हजार ७०७ जणांपैकी २ हजार ३६४ करोना बाधित निष्पन्न झाले आहेत. तर, ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५३ हजार ५०६ होताना, ३ हजार ४८९ जण करोनाबळी गेले आहेत. सातारा जिल्ह्यत ११ तालुके येतात. पैकी एकटय़ा सातारा तालुक्यात जिल्ह्यच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक २२ टक्के रुग्ण निष्पन्न झाल्याने प्रशासनप्रमुख जिल्ह्यच्या ठिकाणी कार्यरत असताना त्यांच्याकडून नेमके काय काम होते असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो आहे.
सातारा राज्यात धोक्याचा जिल्हा म्हणून गणला जात आहे. टाळेबंदी, कडक र्निबध असतानाही, झेपावणाऱ्या करोना संसर्गाने समाजमनाची झोप उडवली आहे. तर, अन्य जिल्ह्यत सुधारणा होत असताना, करोना महासाथीची इथे अजूनही तीव्रता कायम असल्याने याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने आत्मचिंतन करण्याची गरज व्यक्त होत आहे.