मुंबई : राज्यात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत अनेक कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यातच राज्यात प्रवास करण्यासाठी आता ‘ई-पास’ लागू करण्यात आला आहे. रितसर अर्ज करून पास मंजूर झाल्यानंतरच नागरिकांना अत्यावश्यक कारणासाठी प्रवास करता येणार आहे.
22 एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून राज्यातील प्रवास, कार्यालयीन उपस्थिती आणि विवाह सोहळ्याशी संबंधित काही निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. हे निर्बंध एक मेपर्यंत लागू राहणार आहेत. दरम्यानच्या काळात महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास नागरिकांना ई-पासचा वापर करावा लागणार आहे.
अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाह सोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणीबाणी या कारणांसाठीच ई-पास मिळवता येऊ शकतो. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही.
कोणतीही व्यक्ती अथवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करू शकतो. ज्या नागरिकांना ऑनलाइन सेवेसाठीचा ॲक्सेस मिळत नाही, अशा व्यक्तींनी या प्रक्रियेसाठी नजीकच्या पोलिस स्टेशनला भेट द्यावी. तिथे नागरिकांची मदत केली जाईल.