नवी दिल्ली : तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी (6 फेब्रुवारी) झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आता पॅलेस्टाईनमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेत.
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 इतकी मोजण्यात आली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, पॅलेस्टाईनमधील या भूकंपाचा केंद्रबिंदू नब्लस शहरापासून 13 किमी उत्तरेस होता, ज्याची खोली 10 किमी होती.
पॅलेस्टाईनमध्ये रात्री 11.14 वाजता 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा हादरा बसला. स्थानिक वेळेनुसार आणि वेस्ट बँकमधील एरियलच्या अग्नेय दिशेस सुमारे 15 किलोमीटरवर भूकंपाचं केंद्र होतं, अशी माहिती पॅलेस्टाईनच्या मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान, पॅलेस्टाईनसोबतच जेरुसलेम, बीट शेमेश आणि मेवासेरेट झिऑन भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
तुर्की-सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे 8 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे 6 हजारांहून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या असून 3 विमानतळं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप अर्दोन यांनी एका निवेदनात म्हटलंय की, जगातील 84 देशांनी आतापर्यंत बचाव कार्यात मदत देऊ केली आहे. राष्ट्रपतींनी मदत करणाऱ्या देशांचे आभारही मानलेत.