तूर्की : सीरियाच्या सीमेनजीकच्या भागात सोमवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास शक्तिशाली भूकंप झाला. त्यानंतर पुन्हा आता भूकंपाचा झटका तुर्कीत जाणवला आहे. नव्या भूकंपाची तीव्रता 7.5 इतकी आहे.
सकाळी झालेल्या भूकंपात आतापर्यंत 1700हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या भूकंपात नेमकी काय हानी झाली आहे याबद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाहीये.
दुसरा भूकंप हा स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.24 झाला आहे. पहिल्या केंद्रापासून 80 मैल दूर असलेल्या एल्बिस्टान या ठिकाणी झाला आहे.
Notable quake, preliminary info: M 7.5 – 4 km SSE of Ekinözü, Turkey https://t.co/vpJHyNTPMO
— USGS Earthquakes (@USGS_Quakes) February 6, 2023
हा आकडा वेगाने वाढत आहे असंही त्यांनी सांगितलं. 3000हून अधिक नागरिक या भूकंपात जखमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, सीरियात भूकंपामुळे 42 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.8 अशी नोंदली गेली. भूकंपाची तीव्रता लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. भूकंपात अडकलेल्या लोकांच्या सुटकेचं काम सुरु आहे.
भूकंपाची तीव्रता लक्षात घेऊन अमेरिकेने तुर्कीला मदतीची घोषणा केली आहे. “तुर्कीत अतिशय विनाशकारी असा भूकंप आला. अनेक नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. तुर्की प्रशासनाच्या आम्ही संपर्कात आहोत. आम्हाला कोणत्या पद्धतीने आणि वेगवान पातळीवर कशी मदत पोहोचवता येईल याचं नियोजन सुरु आहे”, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितलं.
पहिल्या धक्क्यानंतर काही मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला. यानंतरही अनेकदा धक्के बसत राहिल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
तुर्कीसह लेबनॉन, सीरिया, सायप्रस, इस्रायल या शेजारी देशांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंपाची झळ बसलेल्या भागातील इमारतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती बीबीसी तुर्कीच्या प्रतिनिधींनी सांगितलं.