‘तीर्थक्षेत्र आळंदी, देहू व पंढरपूर येथे सुसज्ज वारकरी भवन उभारावे’

0

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी, देहू व पंढरपूर या तीन ठिकाणी वारकऱ्यांसाठी सुसज्ज वारकरी भवन उभारावे. तसेच देहू व आळंदीत वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी सुसज्ज स्वतंत्र रुग्णालय सुरू करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय वारकरी संघाने माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबईतील मातोश्री निवासस्थानी शनिवारी (दि. १०) अखिल भारतीय वारकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याप्रसंगी शिवसेना नेत्या निलम गोरे, अखिल भारतीय वारकरी संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र महाराज कुंभार, उपाध्यक्ष धुमाळ गुरुजी, सचिव यशवंत महाराज फाले, प्रदेशाध्यक्ष गंभीर महाराज अवचार, आत्माराम शास्त्री, विठ्ठल महाराज गव्हाणे आदींसह अन्य वारकरी संप्रदायातील मंडळी व वारकरी संघाचे सदस्य उपस्थित होते.

दरम्यान वारकरी संप्रदायाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना संत तुकाराम महाराजांची पगडी देऊन सन्मानित करण्यात आले. वारकरी संप्रदायाने आळंदी, देहू व पंढरपूर येथे वारकरी भवन व वारकऱ्यांच्या सेवेसाठी देहू व आळंदीत सुसज्ज रुग्णालय उभारण्याची केलेली मागणी अतिशय योग्य आहे. वारकऱ्यांच्या दोन्हीही मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिवसेना सर्वोतोपरी पाठपुरावा करण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.