कोलंबो : दोन दिवसानंतर राजीनामा देतो, असे सांगून लपून बसलेले राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे हे देश सोडून भारतमार्गे मालदिवला पळून गेले. त्यामुळे संतप्त झालेल्या जनतेने उद्रेक करत, पंतप्रधान निवासस्थानावर हल्लाबोल केला. त्याला पोलिस व सुरक्षा जवानांनी जोरदार प्रतिकार केल्याने धुमश्चक्री उडाली.
देशातील तणावाची परिस्थिती हाताळण्यात सरकारला अपयश आल्याने, आजअखेर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी देशात आणीबाणी लागू केली. आंदोलकांनी राष्ट्रीय चॅनल ताब्यात घेतले असून, तेथील पंतप्रधानांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तातडीने मदतीला या, अशी विनवणी केली आहे. दुसरीकडे, आपल्याच नागरिकांवर शस्त्रे चालवणार नाही, अशी भूमिका घेत श्रीलंकन सैन्याने शस्त्रे खाली ठेवली आहेत.
आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पंतप्रधान निवासस्थान, राष्ट्रीय वृत्तवाहिनी रुपवाहिनीच्या स्टुडिओचा ताबा घेतला आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात नागरिक संसद भवनावर चाल करून जात आहेत, त्यामुळे लवकरच संसददेखील ताब्यात घेतली जाणार आहे. पोलिसांनी केलेला गोळीबार व आंदोलकांसोबत उडालेल्या धुमश्चक्रीय आतापर्यंत ३० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.
पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना हंगामी राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आले असून, पळून गेलेले राष्ट्रपती राजपक्षे हे मालदिवमधून सिंगापूरला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांना देशातून सुरक्षित बाहेर काढण्यात भारताने मदत केली जात असल्याचे सांगितले जात असले तरी, याबाबत भारताकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. श्रीलंकेच्या लष्कराने आपल्या नागरिकांपुढे शस्त्र टाकली असून, नागरिकांवर गोळी चालवणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. तरीही लष्कर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.