मुंबई : कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेचा फटका इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामालाही बसला आहे. हा हंगाम २९ सामन्यांनंतर संघांच्या बायोबबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्याने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे परदेशी खेळाडू हळू-हळू त्यांच्या मायदेशी परतले आहेत. नुकताच आयपीएल २०२१ चा भाग असलेला न्यूझीलंड क्रिकेटपटूंचा ताफा आपल्या मायदेशी सुखरुप परतला आहे.
आयपीएल २०२१ चा भाग असलेले न्यूझीलंडचे सदस्य २ ताफ्यांमध्ये मायदेशी परतले आहे. पहिल्या ताफ्यात ट्रेंट बोल्ट, जीमी निशम, फिन ऍलेन, ऍडम मिल्ने, स्कॉट कुग्लेजिन, शेन बॉन्ड, माईक हेसन आणि जेम्स पामेंट यांचा समावेश होता. तर दुसऱ्या ताफ्यात स्टिफन फ्लेमिंग, ब्रेंडन मॅक्यूलम, काईल मिल्स, लॉकी फर्ग्यूसन, स्कॉट स्टायरिस, सायमन डूल आणि ख्रिस गॅफेनी यांचा समावेश होता. हे सर्व आता पुढील काही दिवस आयसोलेशनमध्ये राहतील.
ट्रेंट बोल्टने न्यूझीलंडला रवाना झाल्यानंतर इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले की ‘माझे मन भारतीय लोकांसाठी दु:खी होत आहे. मला मुंबई इंडियन्सच्या परिवाराला आणि आयपीएलला सोडताना दु:ख होत आहे. पण हे दु:ख त्या दु:खासमोर काहीच नाही, ज्याचा सामना अनेक लोक सध्या करत आहेत.;
त्याने पुढे लिहिले, ‘भारत एक अशी जागा आहे, जिथून मला एक क्रिकेटपटू म्हणून आणि व्यक्ती म्हणून खूप काही मिळाले आहे. मी नेहमीच भारतीय चाहत्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञ असेल. ही कठीण वेळ आहे आणि मला आशा आहे की गोष्टी लवकरच सुधारतील. मी या सुंदर देशात पुन्हा येण्याची वाट पाहातोय.’
याशिवाय बोल्टने मुंबई इंडियन्सचेही घरी सुखरुप पोहचवल्याबद्दल आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतल्याबद्दल आभार मानले आहेत. याबरोबर त्याने सर्वांना सुरक्षित राहा आणि काळजी घ्या, असेही सांगितले आहे.