आठ दिवसापूर्वीच बेलवंडी पोलिस ठाण्यातील पोलिसांचे लसीकरण झाले होते. त्यातील काहींना त्रास होत असल्याने तपासणी केली असता 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. त्यांना घरीच विलगीकरणात ठेवून उपचार सुरु आहेत. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर म्हणाले की, लस घेतल्यानंतर तिचा परिणाम लगेच होत नाही. त्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी जावा लागतो. या पोलिसांना पहिल्याच आठवड्यात करोनाची लागण झाली आहे.
लस घेतली तरी तिचा परिणाम सुरू होऊपर्यंत काळजी घेणे आवश्यक असते. तर याबाबत बेलवंडीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे म्हणाले की आम्ही सर्व पोलिसांना योग्य ती खबरदारी घेऊनच कामावर जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकदम सहा पोलिस आजारी पडल्याने आणि सध्या पोलिसांची जास्त गरज असल्याने कामावर परिणाम होणार आहे. मात्र, इतरांना बाधा होऊ नये यासाठी काळजी घेत असल्याचे ते म्हणाले.