फक्त खायचं आणि लोकसंख्या वाढवायची ही कामे तर जनावरेसुद्धा करतात
सरसंघचालक भागवत यांचे वादग्रस्त विधान
नवी दिल्ली : फक्त खायचं आणि लोकसंख्या वाढवायची ही कामे तर जनावरेसुद्धा करतात. हा मानवधर्म नाही. दुर्बलांचे रक्षण करणे हा खरा मनुष्यधर्म आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
कर्नाटकमधील चिक्कबल्लापूर येथे श्री सत्य साई विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षान्त समारंभात भागवत बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील लोकसंख्या वाढीच्या वेगावर मोठे विधान केले. लोकसंख्या वाढवून केवळ खायचं हे काम तर जनावरेसुद्धा करतात. जनावरांना जंगलात टिकून राहण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात. ताकदवान टिकेल हा जंगलाचा नियम आहे. माणसांमध्ये असे घडत नाही. जेव्हा ताकदवान व्यक्ती दुसऱयाचे रक्षण करतो तेव्हा ते मानवतेचे लक्षण असते, असे सरसंघचालक म्हणाले. हिंदुस्थानने अलीकडे खूप प्रगती केली आहे. देशवासीयांनी विकास पाहिला आहे. आपण इतिहासातून धडा घेत भविष्याकडे बघून विकास केला आहे. कोणी 10-12 वर्षांपूर्वी असे बोलले असते तर ते गांभीर्याने घेतले नसते. देशातील आजच्या विकासाचा पाया खरंतर 1857 मध्येच रचला गेला होता, असा दावा त्यांनी केला. जर कोणाची भाषा, धर्म अन् देशही वेगळा असेल तर ते वादाचे मूळ आहे, असे ते म्हणाले.
विज्ञानाला सृष्टीचा उगम समजलेला नाही!
पर्यावरण आणि विकासामध्ये नेहमीच संघर्ष होत आला आहे. वास्तविक अध्यात्मातूनच श्रेष्ठता प्राप्त होऊ शकते. कारण विज्ञानाला अद्याप सृष्टीचा उगम समजलेला नाही. सर्वकाही एकमेकांशी जोडलेले आहे एवढेच विज्ञानाला कळलेय. पण ते जोडणारा घटक कोणता आहे याचा शोध विज्ञानाने घेतलेला नाही, असेही विधान सरसंघचालक भागवत यांनी केले.
दोन अपत्य धोरण देशासाठी घातक
देशातील लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फक्त दोन अपत्य जन्माला घालण्याचा कायदा करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, जी चूक चीनने केली ती चूक आपण करता कामा नये. हे धोरण देशासाठी घातक ठरू शकते. मी आणि माझा पक्ष दोन अपत्य धोरणाला कधीच पाठिंबा देणार नाही. अशा धोरणामुळे देशाचे फक्त नुकसानच होणार आहे. देशातील लोकसंख्या वाढीचा वेग कमी होत असून 2030 पर्यंत देशाची लोकसंख्या स्थिरावेल, असे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात सरकारने दोन अपत्य कायदा करावा, अशी मागणी केली होती.