मुंबई : राज्यात भाजप आणि शिंदे यांच्या गटाने सरकार स्थापन केल्यानंतर आता प्रतीक्षा आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 11 जुलैनंतर म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. इतकच नाही तर मंत्री म्हणून संधी देताना जातीय आणि विभागीय संतुलन साधताना केवळ दोन निकष न वापरता मंत्री म्हणून काम करण्याचा आवाका किती आहे हे पाहून संधी दिली जाणार आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमत झाले असल्याचेही समजते.
इतर राज्यांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी न्यायालयाने जो काही निकाल दिला. त्यावरून न्यायालयाकडून शिंदे गटाला दिलासा मिळेल, असा दावा केला जात आहे. मात्र, शिंदे आणि फडणवीस यांचे 11 जुलै नंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार करावा असे एकमत झाले आहे. दीड-पावणेदोन वर्षात येणारी लोकसभेची, त्यानंतर सहा-आठ महिन्यांतच विधानसभेची निवडणूक होईल. त्यामुळे कमी कालावधीत अधिक दमदार कामगिरी मंत्र्यांना करावी लागणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सांगितल्यानंतर मी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले. पक्षाचा आदेश हा माझ्यासाठी महत्त्वाचा असून पक्षाने सांगितले तर घरीदेखील बसायची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.