हिंगोली : सेनगाव तालुक्यातील शिंदेवाडी शिवारात शेतात हरभरा पिक झाकत असताना विज कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. विलास शामराव गव्हाणे (40, रा. शिंदेवाडी) असे शेतकऱ्याचे नाव आहे. सुदैवाने पत्नी व दोन मुले दुर अंतरावर असल्याने ते बालंबाल बचावले.
हिंगोली जिल्हयात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका ते मध्यमस्वरुपाचा पाऊस झाला आहे. या पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे गव्हाचे पिक आडवे पडले असून संत्रा, मोसंबी तसेच आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे या फळपिकांचा सडाच शेतात पडला आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळी ढगाळ वातावरण व पाऊस सुरु असल्यामुळे शिंदेवाडी येथील शेतकरी विलास गव्हाणे हे त्यांची पत्नी व दोन मुलांसह शिंदेवाडी शिवारात असलेल्या शेतात हरभरा पिक झाकण्यासाठी गेले होते. यावेळी गव्हाणे हे हरभरा पिकाच्या सुडीवर ताडपत्री झाकत होते तर त्यांची पत्नी व दोन मुले दुर अंतरावर काम करीत होती.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सेनगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक मुपडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मयत गव्हाण यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.