अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या निवासस्थानावर एफबीआयचे छापे

0

अमेरिका : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या फ्लोरिडामधील निवासस्थानावर एफबीआयनं छापे मारले आहेत. स्वतः ट्रंप यांनी ही माहिती दिली आहे.

ट्रंप यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, पाम बीचवरील त्यांच्या घरातला बराचसा भाग एफबीआयनं आपल्या ताब्यात घेतला आहे.

सीबीएस न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष असताना ट्रंप यांनी सरकारी दस्ताऐवज ज्यापद्धतीने हाताळले, त्याच्या तपासणीसंदर्भात हे छापे मारले आहेत.

गेल्या वर्षी अमेरिकेत कॅपिटॉलमध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी एक संसदीय समिती ट्रंप यांची चौकशी करत आहेत.

सीएनएनच्या एका बातमीनुसार, सोमवारी (8 ऑगस्ट) जेव्हा ट्रंप यांच्या फ्लोरिडामधील निवासस्थानी एफबीआयने छापे मारले तेव्हा ते स्वतः न्यूयॉर्कमधल्या ट्रंप टॉवरमध्ये होते.

या छाप्यांसंदर्भात ट्रंप यांनी जे निवेदन प्रसिद्ध केलं आहे, त्यात सुरूवातीलाच ‘आपल्या देशासाठी हा कठीण काळ’ असल्याचं म्हटलं आहे.

ट्रंप यांनी म्हटलं, “मी सर्व सरकारी यंत्रणांसोबत तपासामध्ये सहकार्य केलं आहे. अशावेळी माझ्या घरी अघोषित छापेमारी करण्याला काही अर्थ नाही. हे छापे ज्यापद्धतीने घालण्यात आले आहेत, त्यात अनेक त्रुटी आहेत. न्यायव्यवस्थेवरही नियंत्रण ठेवायचा प्रयत्न केला जातोय, जेणेकरून मी 2024ची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार नाही.”

ट्रंप यांनी पुढे म्हटलं की, अशापद्धतीच्या कारवाईमुळे अमेरिका तिसऱ्या जगातील देशांच्या पंगतीत बसू शकतो. अमेरिकाही इतर भ्रष्ट देशांप्रमाणे झाला आहे, हे दुःखद आहे. अमेरिकेची अशी प्रतिमा याआधी कधीच नव्हती

हे छापे अमेरिकेतील नॅशनल अर्काईव्हज रेकॉर्डसंबंधित असल्याचं सीबीएस न्यूजनंही स्पष्ट केलं आहे.
नॅशनल अर्काईव्हज ही एक सरकारी संस्था आहे. ही संस्था राष्ट्राध्यक्षांशी संबंधित सर्व दस्ताऐवज सुरक्षित ठेवते. फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटने सरकारी दस्ताऐवजांच्या हाताळणीसंदर्भात ट्रंप यांच्या चौकशीचा आदेश दिला होता.

नियमाप्रमाणे अमेरिकेच्या सर्व राष्ट्राध्यक्षांना सर्व पत्र, कामाशी संबंधित कागदपत्रं आणि ईमेल्स नॅशनल अर्काईव्हजकडे हस्तांतरित करायचे असतात. मात्र ट्रंप यांनी अनेक कागदपत्रं नष्ट केल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

नॅशनल अर्काईव्हजनं म्हटलं आहे की, काही कागदपत्रं पुन्हा हस्तगत करण्यात आली आहेत.

अर्थात ट्रंप यांनी सरकारी कागदपत्रांसोबत छेडछाड केल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या असून त्यात काही तथ्य नसल्याचंही म्हटलं आहे.

ट्रंप यांचे एका वरिष्ठ सल्लागारांनी सीबीएसशी बोलताना म्हटलं की, फेडरल एजन्सीची रेड ही राष्ट्राध्यक्षांच्या रेकॉर्डशी संबंधित होती. पाम बीचवरील या सल्लागाराने आपलं नाव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एफबीआयने या छाप्यांसाठी जास्त वेळ घेतला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.