तेजस्वी यादवी यांच्यावर एफआयआर दाखल

0

पाटणा : दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन बिहारमधील राजकारण प्रचंड तापलं आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये आंदोलन पुकारलं म्हणून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर एफआरआय दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार सरकारवर निशाणा साधला आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर अटक करुन दाखवा, असं खुलं आव्हान तेजस्वी यादव यांनी बिहार सरकारला दिलं आहे

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी हजारोंच्या संख्येने दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरुच आहे. या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ तेजस्वी यादव यांनी देखील बिहारमध्ये आंदोलन पुकारलं. त्यांनी सरकारविरोधात निदर्शने दिली. त्यामुळे त्यांच्याविरोधात एफआरआय दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार सरकारवर ट्विटरवर सडकून टीका केली.

“घाबरट मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात आवाज उठवल्याबद्दल आमच्याविरोधात FIR दाखल केला. तुमच्यात दम असेल तर मला अटक करा. मी वाट पाहिन. नाही केलं तर मी स्वत: हून अटक होईन. शेतकऱ्यांसाठी एफआरआय काय फाशीदेखील द्यायची असेल तर द्या”, असा घणाघात तेजस्वी यादव यांनी केला.

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तेजस्वी यादव यांनी महागठबंधनच्या सर्व पक्षांसोबत पाटणातील गांधी मैदानात आंदोलन केलं. यावेळी सरकारविरोधात आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ निदर्शने देण्यात आली. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांच्याविरोधात एफआरआय दाखल करण्यात आला.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्सनुसार कुणालाही एकत्र जमून प्रदर्शन करण्यास अनुमती देण्यात आलेली नाही. याच नियमामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात एफआरआय दाखल करण्यात आला आहे. तेजस्वी यांच्यासह आणखी १८ नेत्यांवर आणि ५०० अज्ञात लोकांवर एफआरआय दाखल करण्यात आला आहे. सर्वांविरोधात कलम १४५, १८८, २६९, २७९ आणि ३ एपेडेमिक डिसिज एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरही बिहार सरकारवर टीका करण्यात आली आहे. “तेजस्वी यादव शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. पण भाजप-जेडीयूचं सरकार कोरोनाचं कारण सांगत धरणं आंदोलनाला अनुमती देत नाही. या फोटोंमध्ये बघा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी कशाप्रकारे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडवला आहे”, असं राजदच्या ट्विटर अकाउंटवर म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.