मुंबई : नगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना तातडीची प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत आहे, अशी घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली.
नगर जिल्हा रुग्णालयात कोविडच्या अतिदक्षता विभागात 17 कोविड रुग्ण उपचार घेत होते. त्यातील दहा जणांचा आज सकाळी अकराच्या सुमारास लागलेल्या आगीत मृत्यू झाला. ही आग शॉकसर्केटमुळे लागली होती, अशी अधिकृत माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये सहा पुरूष व चार महिलांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण ज्येष्ठ नागरिक होते.
आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, नगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली आहे. या दुर्घटनेत 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून 7 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेची माहिती मी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.
या आगीत रामकिसन विठ्ठल हरपुडे (70, माका, ता. नेवासे), सीताराम दगडू जाधव (83, बख्तरपूर, ता. शेवगाव), सत्यभामा शिवाजी घोडचौरे (65, तेलकुडगाव, ता. नेवासे), कडूबाळ गंगाधर खाटिक (65, पाथरवाला, ता. नेवासे), भिवाजी सदाशिव पवार (80, किन्ही, ता. पारनेर), दीपक विश्वनाथ जेडगुले (37, अश्वी, ता. संगमनेर), कोंडाबाई मधुकर कदम (70, केडगाव, ता. नगर), आसराबाई गोविंद नांगरे (58, शेवगाव, ता. शेवगाव), छबाबी अहमद सय्यद (65, शेंडी, ता. नगर) आणि एक अनोळखी व्यक्ती अशा दहा जणांचा यात मृत्यू झाला आहे.