टोकिओ : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान आज अगदी जवळून गोळ्या घालण्यात आल्या. सुरुवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
परंतु, नंतर वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. गाेळ्या लागताच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे हृदयही बंद पडले होते. हल्लेखोरांनी शिंजो आबे हे भाषण करत असताना पाठीमागून दोन गोळ्या झाडल्या, त्या त्यांच्या छातीतून हृदयाच्या बाजूने बाहेर आल्या होत्या. हल्लेखोरास पकडण्यात आले असून, नारा शहरातील ४१ वर्षीय तेत्सुया यामागामी असे त्याचे नाव आहे. जपानचे वरिष्ठ अधिकारी त्याची चौकशी करत आहेत.
जपानच्या वरिष्ठ सभागृहासाठी निवडणूक सुरु आहे. या निवडणुकीत शिंजो आबे हे मैदानात उतरलेले आहेत. शुक्रवारी त्यांची नारा शहरात जाहीर सभा होती. चारही बाजूने कडेकोट बंदोबस्त असताना ४१ वर्षीय तरुणाने पाठीमागून त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यातील त्या आबे यांच्या शरीरातून आरपार गेल्याने ते जागीच कोसळले होते.
सुरक्षा जवान व वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात हलवले. परंतु, ते कोसळले तेव्हा त्यांचे हृदय बंद पडलेले होते, असे त्यांच्या सुरक्षेतील अधिकार्यांनी सांगितले. हल्लेखोराने गोळीबार केल्यानंतर गर्दीत एकच गोंधळ उडाला. पण सुरक्षा रक्षकांनी परिस्थिती आटोक्यात आणत, आबे यांना वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला. त्यांना टोकिओ येथे आणले जात होते. सुरक्षा जवानांनी मोठ्या शिताफीने हल्लेखोरास जेरबंद केले आहे. या घटनेने जपानमध्ये एकच खळबळ उडाली असून, या निवडणुकीला रक्तरंजीत वळण मिळाले आहे.
जपान टाइम्सच्या वृत्तानुसार, शुक्रवारी नारा येथील रस्त्यावर भाषण देत असताना शिंजो आबे यांच्यावर एका व्यक्तीने मागून हल्ला केला. गोळी लागल्याने शिंजो आबे जमिनीवर पडताच त्यांचे सुरक्षा रक्षक लगेच त्यांच्याकडे आले. आबांच्या मानेतून बरेच रक्त निघाल्याचे सांगण्यात येत होते. जखमी झाल्यानंतर शिंजो आबे यांना एअर अॅम्ब्युलन्सने एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शिंजो आबे हे जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिले. आबे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऑगस्ट 2020 मध्ये राजीनामा दिला होता.