नाशिक : नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव नानासाहेब रावजी कापडणीस (70) आणि त्यांचा मुलगा अमित कापडणीस (35 दोघे रा. आनंद गोपाळ पार्क, जुनी पंडित कॉलनी) यांचा मागील डिसेंबर महिन्यात दोन टप्प्यात निर्घृण खून करण्यात आला होता. या गुन्ह्याचा उलघडा करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणात एका व्यावसायिकाला अटक केली आहे. आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या जिल्ह्यात नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला.
पिता-पुत्रांच्या हत्येप्रकरणी नाशिक पोलिसांनी व्यावसायिक राहुल गौतम जगताप (36 रा. आनंद गोपाळ पार्क) याला बुधवारी (दि.16) अटक केली आहे. पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापडणीस पिता-पुत्र हे शरणपूर रोडवरील जुन्या पंडित कॉलनीमध्ये एकटेच राहत होते. त्यांची पत्नी व मुलगी नोकरीनिमित्त मुंबईत राहत होते. अमित याने एम.बी.बी.एस केले असून तो कोणतीही वैद्यकीय प्रॅक्टिस करत नव्हता.
कापडणीस हे राहत असलेल्या आनंद गोपाळ पार्क अपार्टमेंटमध्ये आरोपी राहुल जगताप हा देखील राहत होता. त्याने पिता-पुत्रांवर वॉच ठेवून अमित सोबत मैत्री केली. यानंतर आरोपीने त्यांच्या स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता, बँक, शेअर मार्केट, डिमॅट खात्यातील गुंतवणुकीबाबत सर्व माहिती जाणून घेतली. त्यांच्याकडे गडगंज संपत्ती असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपीने पिता-पुत्रांची हत्या करण्याचा कट रचला.
दरम्यान, कापडणीस यांची पत्नी या नाशिकमध्ये असलेल्या पिता-पुत्रांच्या संपर्कात नव्हत्या. कापडणीस यांची मुलीगी शितल हिने भाऊ अमित याला संपर्क साधला मात्र त्याचा फोन लागत नाही. तर वडिलांचा फोन दुसराच कोणत्यातरी व्यक्तीकडे असल्याचे तिच्या लक्षात आले.
मुलीने फोन केल्यानंतर समोरचा व्यक्ती उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने मुलीने नाशिक गाठले. त्यावेळी तिने वडिलांना फोन केला तर तो फोन संशयित राहुल याने उचलला आणि शितलची भेट घेतली. त्यावेळी राहुल याने घराचे काम सुरु असल्याने तुमचे वडिल व भाऊ हे देवळाली कॅम्प येथील रो-हाऊसमध्ये राहण्यास गेल्याचे सांगितले. राहुलच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शितल ही पुन्हा मुंबई येथे निघून गेली. त्यामुळे कापडणीस पिता-पुत्र बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांपर्यंत उशिराने पोहचली असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.