चोर समजून सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चौघांना बेदम मारहाण

0
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात गावकऱ्यांनी चोर समजून चक्क सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी फक्त सहाय्यक निरीक्षकच नाही तर त्यांच्यासोबत असलेल्या चौघांनाही मारहाण केली. बुलडाणा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कांबळे हे आपल्या नातेवाईकांकडे आरणगाव येथे आले होते. या दरम्यान हा सर्व प्रकार घडला.
संबंधित घटना ही जामखेड तालुक्यातील आरणगाव येथे घडली. बुलढाणा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कांबळे हे आरणगावात नातेवाईकांकडे आले होते. यादरम्यान ते नातेवाईकांसह कोंबडी खरेदी करण्यासाठी गेले होते. यावेळी ग्रामस्थांना चोर असल्याचा संशय आला. त्यातून हे ग्रामस्थ सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कांबळे यांच्यावर चालून गेले.
किरण कांबळे हे त्यांचे भाऊ विशाल कांबळे, सासरे संजय निकाळजे आणि सूनील निकाळजे यांच्यासोबत गावठी कोंबड्या खरेदी करण्यासाठी गेले होते. काही दिवसांपूर्वीच आरणगाव परिसरात दरोडा पडला होता. त्यातच गावात अनोळखी गाडी आल्याने गावातील लोकांना त्यांच्या गाडीवर संशय आला. म्हणून त्यांनी गाडीवर दगड मारला आणि गाडीतील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चौघांना मारहाण केली. दरम्यान गावचे सरपंच वेळीच तिथे आल्याने त्यांनी या चौघांना सोडवले.
याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कांबळे यांनी जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार केली. जामखेड पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत 25 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.