कोट्यावधींची फसवणूक : बांधकाम व्यावसायिकांवर पोलिसात गुन्हा

0

पिंपरी : बांधकाम व्यवसाय करणाऱ्या कंपनीने रेरा रजिस्टर खात्याव्यतिरिक्त खाते उघडून त्यावर सदनिका धारकांकडून पैसे घेतले. घेतलेले पैसे इतर कामासाठी वापरून कंपनीने सदनिका धारकांची 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केली. हा प्रकार 29 नोव्हेंबर 2020 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत बावधन येथील साई विलासिटी फेज दोन येथे घडला.

पृथ्वी शेल्टर्सचे प्रोप्रायटर प्रकाश पांडुरंग चव्हाण (रा. कोथरूड), अनिल रामचंद्र जाधव (रा. डेक्कन), सागर प्रकाश मेहता, सागर रेणुकादासराव टाकळकर, महेश इरिषा इनामदार (तिघे रा. बावधन) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शरद भदू महाले (वय 33, रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी आणि इतर सदनिका धारकांकडून रेरा रजिस्टर खात्याव्यतिरिक्त इतर खाते उघडून त्यावर विश्वासाने पैसे घेतले. घेतलेले पैसे हे ज्या कामासाठी घेतले होते. तिथे पूर्णपणे न वापरता इतर कामासाठी आरोपींनी वापरले.

आरोपींनी केलेला खुलासा हा समाधानकारक नसल्याने सदनिका धारकांचा विश्वासघात करून त्यांनी 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपहार करून फसवणूक केली असल्याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.