भारताला सुवर्ण; भालाफेक मध्ये नीरज चोप्राने मिळवले ‘गोल्ड’

0
टोकियो : भाला फेक मध्ये नीरज चोप्रा याने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याने अंतिम फेरीत 87.58 मीटर थ्रो करत सुवर्ण पटकावले. नीरजने पहिल्या प्रयत्नात 87.03 मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर भाला फेकला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात 76.79 मीटर भाला फेकला, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फाऊल आणि 6 व्या प्रयत्नात फाउल थ्रो केला.
86.67 मीटर थ्रोसह चेकच्या जाकुब वेदलेच दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 85.44 मीटर थ्रोसह चेकचे वितेस्लाव वेसेली तिसऱ्या क्रमांकावर आहे. नीरजने क्वालिफाइंग राउंडमध्ये 86.65 मीटर थ्रो केला होता आणि आपल्या ग्रुपमध्ये पहिल्या नंबरवर होता.
ऑलिम्पिक स्पर्धेत 13 वर्षानंतर भारताला एखाद्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे. यापूर्वी 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक नेमबाज अभिनव बिंद्राला सुवर्णपदक मिळाले होते. बिंद्राने 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते.
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे हे आतापर्यंतचे 10 वे सुवर्णपदक आहे. भारताने यापूर्वी हॉकीमध्ये 8 आणि नेमबाजीमध्ये 1 सुवर्णपदक जिंकले आहे. अशा प्रकारे, हे भारताचे केवळ दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक आहे.
हे भारताचे सर्वात यशस्वी ऑलिम्पिक ठरले आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने 6 पदके जिंकली होती. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली आहेत. नीरजच्या सुवर्ण व्यतिरिक्त मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य, पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक आणि बॉक्सिंगमध्ये लोव्हलिना बोर्गोहेनने कांस्यपदक जिंकले आहे.
नीरज चोप्राने आपले थ्रोइंग स्किल्स आणखी चांगले बनवण्यासाठी जर्मनीचे बायो मेकॅनिक्स एक्सपर्ट क्लाउस बार्तोनित्ज यांच्याकडून ट्रेनिंग घेतली. तेव्हापासून नीरज सलग चांगले परफॉर्म करत आहे.
यापूर्वी 5 मोठ्या इव्हेंटमध्ये जिंकले गोल्ड
इंडियन आर्मीमध्ये कार्यरत असलेल्या नीरजने ऑलिम्पिकपूर्वी 5 मेगा स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहेत. त्याने एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, साउथ एशियन गेम्स आणि वर्ल्ड जुनिअर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहेत.
नीरज चोप्रा हरियाणाच्या पानीपत येथील रहिवासी आहे. त्याने मुळात वजन कमी करण्यासाठी एथलेटिक्सची निवड केली होती. यात अगदी कमी वेळातच स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. तेव्हापासून नीरजने मागे वळून पाहिले नाही. एथलेटिक्समध्ये चांगल्या परफॉर्मंसमुळेच 2016 मध्ये भारतीय लष्कर जॉइन केले.
Leave A Reply

Your email address will not be published.