नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २२ धावांत दोन्ही ओपनर माघारी परतल्यानंतरही भारतीय संघाने दमदार खेळ केला. कर्णधार हरमनप्रीत व जेमिमा रॉड्रीग्ज यांनी विक्रमी ९६ धावांची भागीदारी करून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले. पण, फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीत कमाल दाखवताना बेथ मूनीने सलग दोन धक्के दिले अन् सामना फिरला. त्यानंतर भारताने ३४ धावांत ८ विकेट्स गमावल्या आणि ऑस्ट्रेलियाने गमावलेला सामना खेचून आणला. ११८ धावांवर भारताची तिसरी विकेट पडली अन् त्यानंतर १५२ धावांत संपूर्ण संघ तंबूत परतला. भारतीय महिलांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
बेथ मूनी व कर्णधार मेग लॅनिंग यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला, परंतु राधा यादवने अप्रतिम रन आऊट व सुरेख झेल टिपून पुनरागमन करून दिले. बेथ मूनी ऐकायला तयार नव्हती, तिने अर्धशतकी खेळी करून भारतासमोर तगडे आव्हान उभे केले. दीप्ती शर्माने अफलातून झेल घेत मूनीला बाद केले. राधा यादवने मेग लॅनिंगला (३६) चतुराईने रन आऊट केले. अॅश्लेघ गार्डनरने ( २५) चौथ्या विकेटसाठी मूनीसह झटपट २४ चेंडूंत ३८ धावा जोडल्या. बेथ मूनी एका बाजूने खिंड लढवत होती. दीप्ती शर्माने वन हँडर झेल घेताना ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. बेथ मूनी ४१ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ६१ धावांवर माघारी परतली. रेणूकाने आज दोन विकेट्स घेत स्पर्धेत सर्वाधिक ११ विकेट्सचा विक्रम नावावर केला. ऑस्ट्रेलियाने ८ बाद १६१ धावा केल्या.
शेफाली वर्मा व स्मृती मानधना या जोडीने पहिल्या षटकापासूनच फटकेबाजीला सुरुवात केली. प्रचंड आत्मविश्वासाने या दोघींनी फटके मारले. पण, डार्सी ब्राऊनने दुसऱ्या षटकात या आत्मविश्वासाचा चुराडा केला. मानधना ६ धावांवर त्रिफळाचीत झाली. पुढच्याच षटकात अॅश्लेघ गार्डनरच्या गोलंदाजीवर शेफालीने उत्तुंग फटका मारला, परंतु मेगन शूटकडून सोपा झेल सुटल्याने शेफालीला १० धावांवर जीवदान मिळाले. पण, चौथ्या चेंडूवर शेफालीने तिच चूक केली आणि यावेळेत ताहलिया मॅग्राथने झेल घेतला. भारताला २२ धावांवर दुसरा धक्का बसला. ताहलियाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिने दूरूनच या विकेटचे सेलिब्रेशन केलं. जेमिमा रॉड्रीग्ज व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी भारताचा डाव सावरताना काही सुरेख फटके मारले.
जेमिमा व हरमनप्रीत यांनी ९० + धावांची भागीदारी करताना राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताकडून सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम नावावर केला. विजयासाठी ४४ धावांची गरज असताना जेमिमाची विकेट पडली. तीन ३३ चेंडूंत ३३ धावा करून माघारी परतली. तिने तिसऱ्या विकेटसाठी ७१ चेंडूंत ९६ धावा जोडल्या. १६व्या षटकात बेथ मूनीने सामन्याला कलाटणी दिली. पूजा वस्त्राकर ( १) व हरमनप्रीत यांना सलग दोन चेंडूंत माघारी पाठवले. हरमनप्रीतने ४३ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६५ धावा केल्या. १० चेंडूंत भारताच्या ३ विकेट पडल्याने ऑस्ट्रेलियाने कमबॅक केले. स्नेह राणा व दीप्ती शर्मी ही नवी जोडी मैदानावर होती. १८ चेंडूंत २८ धावा हव्या असताना स्नेह चौकार मारून पुढच्या चेंडूवर रन आऊट झाली. आता भारताला १५ चेंडूंत २३ धावा हव्या होत्या. स्नेह ८ धावांवर बाद झाली.
भारताला १२ चेंडूंत १७ धावा हव्या होत्या. १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर राधा यादव रन आऊट झाली. दीप्ती १३ धावांवर मेगन शूटच्या गोलंदाजीवर LBW झाली. भारताला ९ चेंडूंत १३ धावा हव्या होत्या. कनकशन खेळाडू म्हणून आलेल्या यास्तिका भाटीयाची निवड झाली होती. तानिया भाटीयाला यष्टिरक्षण करताना दुखापत झाली होती. आता भारताला ६ चेंडूंत ११ धावा हव्या होत्या. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर यास्तिकासाठी मेघनाने स्वतःची विकेट टाकली. सामना ४ चेंडू १० धाव असा चुरशीचा झाला. यास्तिका पुढच्याच चेंडूवर LBW झाली अन् भारताचा पराभव निश्चित झाला. भारताचा संपूर्ण संघ १५२ धावांत तंबूत परतला.