‘सरकार गरिबांना लस देणार पण…’

0

पुणे : केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार, राज्य सरकारकडून लसीकरणाच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. पण आता याच लसीकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केले आहे. ‘ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वत: खर्च करून लस घ्यावी. गरिबांना आम्ही लस देऊ’, असे म्हटले आहे.

पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘राज्यासाठी रेमडेसिव्हिरचा कोटा कमी करण्यात आला आहे. त्यासंदर्भात आम्ही केंद्रांशी बोललो आहे. जामनगरमधील ऑक्सिजनचा जो 250 मेट्रिक टनचा कोटा होता, तो कमी करण्यात आला आहे. तो कमी करू नये, यासंदर्भातही केंद्रांशी चर्चा सुरु आहे. तसेच लस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार आहोत. टेंडरमध्ये सर्व लस कंपन्यांचा उल्लेख केला जाणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यातील जनतेला मोफत लस देण्यासंदर्भात 1 मे ला मुख्यमंत्री बोलणार आहेत. सीरमचे आदर पुनावाला यांच्याशी लसींच्या पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री स्वतः बोलले आहेत, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, लोकसंख्येच्या तुलनेत लसींचा पुरवठा कसा होतो हे पाहणेही महत्वाचे आहे. केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस सबसिडी योजनेप्रमाणे आम्हीही लसींसंदर्भात नागरिकांना आवाहन करणार आहोत. त्यामध्ये ज्यांना शक्य असेल त्यांनी स्वत: खर्च करून लस घ्यावी. गरिबांना आम्ही लस देऊ असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.