इरशाळवाडीत मदतीसाठी रिलायन्स फाऊंडेशनकडून हॅम रेडिओ सेटअप

0

मुंबई : रायगडमधील खालापूरमध्ये मुंबई-पुणे जुन्या हायवेच्या बाजुला नानिवली गाव आहे. तेथून 4 हजार फूट उंचीवर इरशाळवाडी आहे. इरसालगडाच्या पायथ्यापासून या गावापर्यंत जाण्यासाठी खडी चढण आहे. त्यामुळे या वाडीपर्यंत वाहने जात नाहीत. जवळपास दीड तास पायी वाट तुडवतच या वाडीपर्यंत जाता येते. तसेच, इरशाळवाडीवर मोबाईल नेटवर्कही नाही. त्यामुळे बचावकार्याच्या पहिल्यादिवशी कनेक्टिव्हिटीची मोठी समस्या निर्माण झाली होती. पायथ्याला असलेल्या प्रशासनापर्यंत सूचना कशा पोहोचवायच्या, हा मोठा प्रश्न बचावपथकासोबतच प्रशासनासमोरही उभा ठाकला होता.

रिलायन्स फाऊंडेशनला ही समस्या कळताच फाऊंडेशनने इरशाळवाडीत धाव घेत ही समस्या दूर केली आहे. रिलायन्स फाऊंडेशनकडून गडाच्या पायथ्याशी हॅम रेडिओ सेटअप ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेचे संचालक जयप्रकाश यांनी यंत्रणेबाबत सांगितले की, वायरलेस कंट्रोलच्या माध्यमातून इरसालगडाच्या पायथ्याला अँटिना उभा करण्यात आला आहे.

इरशाळवाडीपासून ते पायथ्यापर्यंत एकूण 5 रेडिओ सेटअप उभारण्यात आले आहे. या सेटअपमध्ये 12 जण कार्यरत आहेत. घटनास्थळावरून जी काही माहिती उपलब्ध होईल ती प्रशासनाला पोहचवली जात आहे. घटनास्थळावरून इमर्जन्सी मेसेज आला तर रेडिओच्या माध्यमातून ही माहिती पायथ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडे पोहोचते. कर्मचारी तो मॅसेज प्रशासकीय यंत्रणेला देतात. त्यानंतर आवश्यकतेनुसार मदतीबाबतचे पुढील नियोजन केले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.