MPSC परीक्षा पुढे ढकलल्याने पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन

0
पुणे : सध्या राज्यात कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच आता ३ दिवसांनी म्हणजेच १४ मार्च रोजी होणारी राज्य सेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवार मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत. त्याचा उद्रेक पुण्यामध्ये पाहायला मिळाला. या उमेदवारांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. तसेच परीक्षा रद्द केली जाऊ नये, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. हे उमेदवार मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. पण विद्यार्थी काही मागे हटायचे नाव घेत नाही आहेत. ही परीक्षा आतापर्यंत ५ वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. २०२० मध्ये ही पूर्व परीक्षा घेतली जाणार होती, पण कोरोनाच्या संक्रमणामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.

आयोगाचं म्हणणं काय?
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत येत्या रविवारी १४ मार्च २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या निर्देशांनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. कोविड – १९ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्यात बँकिंगच्या परीक्षा, यूपीएससी परीक्षा, बोर्डाच्या परीक्षा होतात, मग फक्त एमपीएससीचीच परीक्षा आयोजित न करण्यामागे नेमकं काय कारण आहे, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून विचारण्यात आला आहे. जर राज्यात कोरोना संक्रमण आहे तर या उमेदवारांना पीपीई किट घालून परीक्षा देऊ द्या, पण परीक्षा रद्द करू नका, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.