हिंगोली : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पायाचीही बरोबरी नसलेल्या केंद्रीय राज्यमंत्री राणे यांनी त्यांच्या बद्दल बोलणे चुकीचे आहे. पोलिस संरक्षण बाजूला केल्यास त्यांच्या घरात घसून त्यांचा कोथळा बाहेर काढण्याची आपली तयारी असल्याचे खुले आव्हान कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी मंगळवारी ता.२४ रात्री झालेल्या आंदोलनाच्या वेळी दिले.
हिंगोली येथे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रात्री सात वाजण्याच्या सुमारास महात्मा गांधी चौकात केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांची प्रतिकात्मक अंतयात्रा काढून त्यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी युवासेनेचे पदाधिकारी राम कदम, नगरसेवक श्रीराम बांगर, परमेश्वर मांडगे, माजी उपसभापती अजय सावंत पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राणे यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
यावेळी बोलतांना आमदार बांगर म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे काम उत्कृष्ठ पध्दतीने सुरु आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामाचे देशभरात कौतूक केले जात आहे. राज्यात सर्व चांगले काम सुरु असतांना मात्र केंद्रीय राज्यमंत्री राणे यांनी मुख्यमंत्र्याच्या विरुध्द बेताल वक्तव्य केले. मात्र हा प्रकार सुर्यावर थुंकण्या सारखा आहे. राणेंना ज्या पक्षाने सोबत घेतले त्या पक्षालाच त्याचे परिणाम भोगावे लागतील. राणे कोणत्या एका पक्षाचे होऊ शकले नाही ते भाजपचे काय होणार असा सवालही त्यांनी केला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्यल करणाऱ्या केंद्रीय मंत्री राणे यांच्या घरात घूसून मारण्याची आमची तयारी आहे. पोलिस संरक्षण बाजूला केल्यास राणे यांच्या घरात घुसून त्यांचा कोथळा बाहेर काढू असा इशारा वजा खुले आव्हान शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी यावेळी दिले.