एक मुख्यमंत्री बनवू शकले नाही त्यांनी भाजपची चिंता करु नये

0

सांगली : वीस वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही त्यांनी भाजपची चिंता करू नये त्यांचे 54 आमदार कमी होऊ नयेत, म्हणून शरद पवार वारंवार भाजपची सत्ता येणार नाही असं सांगत आहेत. डबल एक्स शरद पवारांनी भाजपची चिंता करू नये आपले आमदार फुटू नयेत याची काळजी करावी, असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देशातील चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने विजय मिळवलेला आहे. या विजयानंतर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये भाजपाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार, असा दावा केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आपण आहे, तो पर्यंत भाजपची सत्ता येऊ देणार नाही, असे वक्तव्य केले आहे. त्यानंतर भाजपाचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात अद्याप एक राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला नाही. पावसात भिजून देखील राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या 54 च्यावर गेली नाही. केवळ भाजपचे आमदार फुटणार अशी वारंवार चर्चा केली जाते. मात्र अद्याप एकही आमदार फुटलेला नाही. मात्र आता देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपची एक हाती सत्ता येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या 54 आमदारांपैकी कोणीही फुटू नये म्हणून शरद पवार वारंवार महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणार नाही, असं वक्तव्य करत आहेत. पण त्यांनी भाजपची चिंता करू नये, आपल्या पक्षाची चिंता करावी आणि आपले आमदार फुटू नयेत याची काळजी करावी, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.