कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

0

पुणे : सध्या राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. मुंबईसह परिसरात देखील जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच दुसरीकडे राज्यातील मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, येत्या 24 तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर काही ठिकाणी अतीवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढचे दोन ते तीन 3 दिवस राज्यात पाऊस सक्रीय राहणार आहे. यामध्ये पालघर, दक्षिण कोकण, पुणे आणि पूर्व विदर्भात रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई ठाणे, मध्य महाराष्ट्र व विदर्भ काही भाग ऑरेंज‌ अॅलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तर सांगलीतही कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

कोकणात विविध ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं नदी नाले ओसंडून वाहत आहेत. काल सर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात झाली. लांजामध्ये 330 मिमी, मंडणगडमध्ये 170 मिमी, देवरुख 140 मिमी, चिपळूण 140 मिमी, रत्नागिरीत 130 मिमी पाऊस, तर रायगडातील ताळामध्ये 210 मिमी, म्हसळात 190 मिमी, माणगावात 160 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासात तीव्र होत आहे. त्यामुळं राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मुंबईसाठी आजही (10 ऑगस्ट) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर देखील अतिवृष्टी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीत 200 मिमी, साताऱ्यातील महाबळेश्वरामध्ये 190 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शाहूवाडीत 150 मिमी, लोणावळ्यात 140 मिमी पावसाच्या नोंदीसोबत अतिमुसळधारेची नोंद करण्यात आली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. वैजापूर, कन्नड, लोहारा, भोकरदनमध्ये 30 मिमी पावसाची नोंद झाली.

दरम्यान आज विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, आणि गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.