पुणे : गायब झालेला मॉन्सूनचा पाऊस येत्या ४८ तासांत कमबॅक करेल असा अंदाज पुणे वेध शाळेने केला आंबे. दक्षिण आणि उत्तर कोकण भागात ८ ते १० जुलैला मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे. त्यामुळे खरीप हंगामातील रखडलेल्या भात लागवडीच्या कामांना पुन्हा एकदा सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तौक्ते चक्रीवादळानंतर मॉन्सूनचे आगमन दमदार झाले होते; मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सूनने काढता पाय घेतला. रखडलेला मॉन्सूनच्या प्रवासानंतर आता पुणे वेधशाळेने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
पावासाने विश्रांती घेतल्याने खरीप हंगामातील शेती लागवडीत मोठा व्यत्यय आला आहे. नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांवर भातशेतीची लागवड सुरू असली तरी पावसाचे पाणी हे भात शेतीसाठी आवश्यक आहे.
अलिकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भातशेती केली जाते; मात्र कोकणातील किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात शेती ही पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यंदा मे महिन्यातच भात पेरणी उरकून जूनच्या पहिल्या पंधरवड्यात लावणीच्या कामालाही सुरुवात झाली.