पुणे : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात केली आहे. आजपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस सक्रीय होणार आहे. तर 10 जुलैपासून राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईसह, ठाणे, कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, सातारा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात सध्या मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. तर बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येत आहे. यामुळे कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या मुसळधार पाऊस पाहायला मिळेल.
विदर्भ, मराठवाडय़ासह मध्य भारतात 9 जुलैपासून पाऊस होणार होईल. तसेच 11 जुलैला अनेक ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.